अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दिनांक ११ मार्च २०२४ रोजी मौजे जातेगाव खुर्द, ता. शिरूर, जि.पुणे गावच्या हद्दीत कोरेगाव धानोरे कॅनॉललगत एका अनोळखी पुरुषाचे (वय ४० वर्षे) प्रेत आढळून आले होते. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला असून गुन्हा उघडकीस आणला आहे. खून करून मृतदेह फेकल्या प्रकरणी शिकापुर पोलीसांनी चार जणांना अटक केली आहे.
मयताची ओळख पटविण्यासाठी मयताच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता, मयत व्यक्ती हा माधव दशरथ करडे (वय ४० वर्षे, रा.चुंब, ता. बार्शी, जि. सोलापुर) यांचा असल्याचे त्याचा भाऊ उध्दव दशरथ करडे यांनी ओळखुन सांगितले होते. करडे यांच्या मृत्युबाबत चौकशी केल्यानंतर मयत व्यक्ती माधव करडे हा सणसवाडी गावातील भुजबळवस्ती येथे दारू पिण्यासाठी गेला होता. तेथेच दारू पिण्यासाठी आलेला रमेश वामन हरगुडे, (वय ४६ वर्षे, रा. गव्हाळेवस्ती, सणसवाडी, ता. शिरूर, जि.पुणे) यांचेमध्ये शाब्दीक वाद व शिवीगाळ झाल्याने रमेश हरगुडे याने लाकडी दांडके माधव याच्या डोक्यात मारून खुन केला होता.
त्यानंतर सदर ठिकाणी दारू धंदा करणाऱ्या महीलेने ते प्रेत पाहीले व तिच्या इतर ३ नातेवाईकांना बोलावुन घेवुन ते प्रेत टेम्पोमध्ये टाकुन ते जातेगाव खुर्द गावचे हद्दीतील कॅनॉलच्या कडेला टाकुन दिले होते. पोलीसांनी एकुण ४ संशईतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केल्यानंतर त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.
त्याप्रमाणे अकस्मात मयताचे चौकशी अधिकारी संदीप साळुंखे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी वरील आरोपींविरूध्द खुन करणे व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशान प्रेत टाकुन दिल्याबाबत फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्ह्याच्या तपासात एकुण ४ आरोपींना अटक करण्यात आली असुन एका आरोपीचा शोध घेणे चालु आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री महेश डोंगरे हे करीत आहेत.