नवी दिल्ली: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिल्ली हायकोर्टाने आक्षेप घेतला आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचारावेळी खासदार राहुल गांधी यांनी एका रॅलीत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना खिसेकापू म्हटलं होते. राहुल गांधी यांनी 22 नोव्हेंबर रोजी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना गेल्या महिन्यात कारणे दाखवा नोटीस देखील पाठवली आहे. दरम्यान, हायकोर्टाने निवडणूक आयोगाला या प्रकरणावर आठ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यांचं ते वक्तव्य चुकीचं होतं, असं देखील हायकोर्टाने म्हटलं आहे.