Chhattisgarh Crime: छत्तीसगडमधील सीतापूर पोलीस स्टेशन परिसरातून मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय तरुणीवर तिच्याच 24 वर्षीय मित्राने फिरण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन बलात्कार केल्याचा आणि नंतर तिला मारहाण करून नाल्यात ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

इंदल साई किंडो असे आरोपी तरुणाचे नाव असून याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?
चालता गावातील हर्रतिक्रा येथील रहिवासी असलेला आरोपी इंदल साई किंडो (Indal Sai Kinddo) याने पीडित तरुणीला फिरायला जाण्यासाठी आग्रह केला. मित्र असल्याने तिच्यावर विश्वास ठेवून ती आरोपीसोबत गेली. फिरण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला एका निर्जन परिसरात नेले. तिथे गेल्यावर त्याने तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. पीडितेने विरोध केला असतानाही त्याने लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला.

पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने तिला मारहाण केली. आपली वासना पूर्ण झाल्यानंतर त्याने तिला जवळील नाल्यात ढकलून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या दुर्दैवी घटनेनंतर पीडितेने तातडीने कुटुंबीयांना फोन करून माहिती दिली, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पीडित तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी इंदल साई किंडो याच्याविरुद्ध बलात्कार, हल्ला आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने पथक तयार करून आरोपीला अटक केली आहे.







