पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातही विविध भरती परीक्षांमधील गैरप्रकार समोर येत आहेत. एमपीएससी आणि हायकोर्टाच्या लिपिक भरतीतील वादानंतर आता पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुणे पालिकेच्या परीक्षेत ‘हायटेक’ गैरप्रकारपुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याची बाब 16 जून रोजी निदर्शनास आली होती, असा दावा नगरसेवक नाना भानगिरे यांनी केला आहे.

महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता या परीक्षेत तीन उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक केल्याचे पालिका प्रशासनाने मान्य केले आहे. असे असतानाही पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी 169 उमेदवारांना नियुक्तीपत्रे कशी दिली, असा थेट सवाल भानगिरे यांनी विचारला आहे. प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याचा आरोप करत, या सर्व नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उमेदवारांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी ही भरती तात्काळ रद्द करून पुन्हा निष्पक्ष परीक्षा घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दुसरीकडे , मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी झालेल्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरसह अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन छेडले होते. या आंदोलनात सीजेपीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनी देखील सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन उच्च न्यायालय प्रशासनाने ही टायपिंग परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. लवकरच या परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

एकंदरीत, राज्यातील विविध शासकीय भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.






