पुणे: कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण (Pune Traffic Changes) मार्गावरील हांडेवाडी चौकातील वाहतूक कोंडी (Pune Traffic News) कमी करण्यासाठी वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल केले आहेत. या मार्गाचा वापर प्रामुख्याने सासवड, हडपसर आणि कात्रज या दिशेने जाणाऱ्या वाहनांकडून केला जातो. उंड्री, पिसोळी आणि हांडेवाडी परिसरात गेल्या दहा वर्षांत अनेक गृहप्रकल्प उभे राहिल्याने या भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हांडेवाडी चौकात कायमच वाहतूक कोंडी होत असल्याने, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मार्गयोजना लागू करण्यात आली आहे.

नवीन बदलानुसार, श्रीराम चौक, जेएसपीएम महाविद्यालय आणि हांडेवाडी चौकातून कात्रज किंवा हडपसर-सासवड रस्त्यावरील मंतरवाडी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी डावीकडे वळावे. कात्रजकडून येणाऱ्या वाहनांनी मंतरवाडीकडे जाऊन जोगेश्वरी मिसळ परिसरातून उजवीकडे वळावे आणि तेथून आपल्या गंतव्यस्थळी जावे. श्रीराम चौक, जेएसपीएम महाविद्यालय आणि हांडेवाडी चौकातून होळकरवाडी किंवा कात्रजकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनीही डावीकडे वळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कात्रजकडून मंतरवाडीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरून उजवीकडे वळावे आणि तेथून पुढे जावे. होळकरवाडी किंवा मंतरवाडीकडून येणाऱ्या दुचाकी आणि मोटारींनी जेएसपीएम महाविद्यालय, श्रीराम चौक, सय्यदनगर किंवा हडपसरकडे जाण्यासाठी हांडेवाडीकडून कात्रजमार्गे जावे. शिवेंद्र हॉटेलकडून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जाणे सोयीचे ठरेल. तर अवजड वाहनांनी मयुरी वजनकाटा परिसरातून वळून जेएसपीएम महाविद्यालय, सय्यदनगर आणि हडपसरकडे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या प्रायोगिक वाहतूक बदलांबाबत काही सूचना किंवा अभिप्राय असल्यास ते लेखी स्वरूपात वाहतूक शाखा, येरवडा कार्यालयात पाठवावेत. नवीन प्रणालीबाबतचे निरीक्षण आणि प्रतिसाद पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.







