मुंबई: मुंबईतील चेंबूर परिसरात २४ वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. आरसीएफ गाव परिसरातील म्हैसूर कॉलनीत ही घटना घडली असून, मृत तरुणी दोन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तिच्या प्रियकराने तिला विषारी पदार्थ दिल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी आशिष मगर याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृत तरुणीचे नाव विष्णुमाया असल्याचे समोर आले आहे. २५ ते २६ ऑगस्टदरम्यान तिची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर ती घरातील खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

विष्णुमायाच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता. मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांसह या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली. घटनास्थळाची पाहणी करून उपलब्ध पुरावेही तपासण्यात आले.

तपासादरम्यान विष्णुमायाला तिच्या प्रियकराने ‘थम्स अप’ या शीतपेयातून कथितरित्या डांबराच्या गोळ्या दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुसऱ्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून आशिष मगरने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या प्रकरणातील नेमके कारण आणि घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, विष्णुमाया दोन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. तिच्या मृत्यूमागे नेमकी कोणती परिस्थिती होती, याचा आरसीएफ पोलीस सखोल तपास करत आहेत. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात आहे.
आशिष मगरला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलिसांकडून त्याची चौकशी करून घटनेमागील कारण, कथित विषप्रयोगाची पद्धत आणि या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचा तपास केला जाणार आहे. तपास पुढे गेल्यानंतर या संशयास्पद मृत्यूमागील संपूर्ण सत्य समोर येण्याची शक्यता आहे.






