नवी दिल्ली : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले. आता याच घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याणी प्रतिक्रिया दिली आहे. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर तो पुतळा पडला नसता, असे भाष्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे आहे. कारण स्टेनलेस स्टीलला गंज लागत नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. ते दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते.
समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपूलांसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा, यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत असून मी मुंबईत जेव्हा 55 उड्डाणपूल बांधले तेव्हा मी एका माणसासोबत फेरफटका मारत होतो. तेव्हा त्याने मला उड्डाणपूलासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडावर पावडर कोटिंग वापरण्यात आल्याचे दाखवले होते. या पावडर कोटिंगमुळे लोखंड गंजणार नाही, असा दावा त्याने केला होता.
मात्र, नंतरच्या काळात मुंबईतील उड्डाणपूलांसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडाला गंज लागला. त्यामुळे आता मला असे वाटते की, समुद्रकिनाऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात रस्त्यांचे बांधकाम करताना स्टेनलेस स्टीलचाच वापर करणे गरजेचे आहे. जर राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतानाही स्टेनलेस स्टील वापरले असते तर हा पुतळा पडला नसता, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नटबोल्टला गंज..
भारतीय नौदलामार्फत राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या 28 फुटी ब्राँझच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. हा पुतळा जयदीप आपटे या शिल्पकाराने उभारला होता. या पुतळ्याच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेले नटबोल्ट गंजल्याची माहिती समोर आली होती. याबाबत सार्वजनिक विभागाने नौदल विभागाला कळवले होते. परंतु, नौदलाकडून त्यानंतर कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र, आठ महिन्यांमध्ये हा पुतळा पडल्याने महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती.