पुणे प्राईम न्यूज: भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिल्ला यांना लिहिलेल्या पत्रात दुबे यांनी म्हटले आहे की, टीएमसी खासदार एका व्यावसायिकाकडून पैसे घेतात आणि नंतर सभागृहात सरकारला प्रश्न विचारतात. भाजप खासदाराने म्हटले आहे की, महुआ मोईत्रा यांच्यावर आयपीसीच्या कलम 120A अंतर्गत गुन्हा केला आहे. तसेच संसदेतील विशेषाधिकारांचे उल्लंघन केले आहे आणि सभागृहाचा अवमान केला आहे.
भाजपच्या या आरोपांवर टीएमसी खासदार महुआ मोईत्रा चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी या प्रकरणी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार असल्याचे सांगितले. महुआ म्हणाल्या की, जर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांना अदानी प्रकरणाचा तपास केल्यानंतर मोकळा वेळ मिळाला तर ते त्यांच्याकडे चौकशीसाठी येऊ शकतात. दरम्यान, भाजप खासदाराने महुआ मोईत्रा यांच्यावर कोणत्या आधारावर आरोप केले आहेत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निशिकांत दुबे यांच्या पत्रात कोणते आरोप ?
महुआ मोइत्राशी संबंधित तक्रारीत निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून एका वकिलाच्या संशोधन कार्याचा दाखला दिला होता. ते म्हणाले की, महुआ मोईत्रा यांनी अलीकडील 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न व्यावसायिक दर्शन हिरानंदानी आणि त्यांच्या कंपनीच्या व्यावसायिक हिताचे रक्षण करण्यासाठी विचारले आहेत. त्यांचे प्रश्न अनेकदा दुसर्या व्यवसाय समूहावर अदानी समूहावर केंद्रित होते. हिरानंदानी ग्रुप अदानी विरोधात बिझनेस बोली लावत असल्याचा दावा दुबे यांनी केला आहे.
पुढे या पत्रात निशिकांत यांनी लिहिले आहे की, जेव्हा जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू असते, तेव्हा महुआ मोईत्रा आणि ज्येष्ठ खासदार सौगता रॉय यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC) ची ओरडणारी ब्रिगेड कोणत्या ना कोणत्या कारणाने सभागृहातून बाहेर पडते. सतत गैरवर्तन करून सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्याची सवय त्यांना आहे. त्यांच्या या हैराण करणाऱ्या रणनीतीमुळे इतर सदस्यांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होते. इतर खासदारांना सामान्य लोकांच्या समस्या आणि सरकारच्या धोरणांवर चर्चा करायची असते.
गुन्हेगारी कटात सहभागी
निशिकांत यांनी लिहिले आहे की, लोकसभेत सामान्य जनतेचे प्रश्न विचारण्याऐवजी एका व्यावसायिकाकडून पैसे उकळण्याचा आणि दुसऱ्या व्यावसायिक गटाला लक्ष्य करण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न करण्यात आला. महुआ मोईत्रा या ‘नैतिकता’ दाखवतात, परंतु, त्या स्वत: गुन्हेगारी कटात सामील असल्याचे स्पष्ट होते.
कोण आहेत दर्शन हिरानंदानी?
या संपूर्ण प्रकरणामध्ये दर्शन हिरानंदानी यांचे नाव वारंवार समोर येत आहे. दर्शन हिरानंदानी हे एक प्रसिद्ध उद्योगपती आणि रिअल इस्टेट व्यवसाय हिरानंदानी ग्रुपचे सीईओ आहेत. हिरानंदानी ग्रुपचे संस्थापक निरंजन हिरानंदानी यांचे ते पुत्र आहेत. या समूहाची अनेक बांधकामे भारतभर सुरू आहेत. हा ग्रुप बांधकामापासून ते व्यावसायिक मालमत्तेचे व्यवहार, आयटी पार्क विकसित करणे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये टाऊनशिप बांधणे यासारख्या प्रकल्पांमध्ये गुंतलेला आहे.
दर्शन हिरानंदानी यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, न्यूयॉर्क, यूएसए येथून बी.एस. आणि एमबीए पदवी प्राप्त केली आहे. समूहाच्या रिअल इस्टेट व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे श्रेय दर्शन यांना जाते, असे त्यांची प्रोफाइल म्हणते. याशिवाय, डेटा सेंटर्सची स्थापना, क्लाउड कंप्युटिंग, ऊर्जा क्षेत्र, औद्योगिक गोदाम आणि लॉजिस्टिक्स यासारख्या इतर अनेक क्षेत्रात कंपनीची पावले पुढे नेण्यासाठी ते ओळखले जातात.