भारत: केंद्राने महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशसह देशातील आठ राज्यांना बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाबद्दल सतर्क केले आहे आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. देशभरातील ३४ ठिकाणी या प्रादुर्भावाची नोंद झाली आहे, त्यामुळे या आठ राज्यांना तात्काळ उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. झारखंडमध्ये दोन, तेलंगाणामध्ये तीन आणि छत्तीसगडमध्ये दोन ठिकाणी बर्ड फ्ल्यू सक्रीय असल्याचे दिसून आले आहे. केंद्राने राज्यांना संक्रमित पक्ष्यांना मारणे, प्रभावित क्षेत्रांचे निर्जंतुकीकरण करणे आणि पोल्ट्री उत्पादनांवर निर्बंध घालणे यासारख्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. देशात महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आदी आठ राज्यांमधील एकूण ३४ ठिकाणी कुक्कुटवर्गीय पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रात वाघ, बिबट, गिधाड, कावळे, ससाणा आणि बगळे यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. संक्रमित प्राणी, पक्ष्यांशी संपर्क टाळण्याचा आणि पोल्ट्री उत्पादनांशी व्यवहार करताना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल आणि मानवी आरोग्यास संभाव्य धोक्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे .कोंबड्यांना भोपाळ येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने तयार केलेली एच ९ एन २ (लो पॅथोजेनिक एव्हियन एन्फ्लूएंझा) या प्रतिबंधक लस देण्याची सूचना दिली आहे.