Bihar Assembly Election 2025: भारतीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून, राज्यात मतदान दोन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येतील.

बिहार विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 रोजी संपत आहे. त्यामुळे आयोगाने वेळेवर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

दोन टप्प्यांतील मतदानाचा तपशील
राज्यातील एकूण 243 विधानसभा मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यात 121जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 122 जागांसाठी मतदान होईल.
पहिला टप्पा: (First Phase Bihar Assembly Election 2025)
- अधिसूचना जारी: 10 ऑक्टोबर 2025
- नामांकन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 17 ऑक्टोबर (शुक्रवार)
- अर्जांची छाननी: 18 ऑक्टोबर (शनिवार)
- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 20 ऑक्टोबर (सोमवार)
- मतदान: 6 नोव्हेंबर (गुरुवार)
दुसरा टप्पा: (Second Phase Bihar Assembly Election 2025)
- अधिसूचना जारी: 13 ऑक्टोबर (सोमवार)
- नामांकन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 20 ऑक्टोबर (सोमवार)
- अर्जांची छाननी: 21 ऑक्टोबर (मंगळवार)
- मागे घेण्याची अंतिम तारीख: 23 ऑक्टोबर (गुरुवार)
- मतदान: 11 नोव्हेंबर (मंगळवार)
दोन्ही टप्प्यांतील मतमोजणी 14 नोव्हेंबर (शुक्रवार) रोजी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 16 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.







