बांग्लादेश : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ढाका सोडले आहे. सद्या बांग्लादेशमधील परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर गेली असून बांग्लादेशचे लष्कर प्रमुख लवकरच मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशात हिंसक निदर्शने सुरु आहेत. पंतप्रधान हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या लाखो निदर्शकांनी कर्फ्यूला झुगारत राजधानीच्या रस्त्यावर मोर्चा काढला. तसेच त्यांनी पंतप्रधानांच्या घरात प्रवेश सुद्धा केला.
काल झालेल्या भीषण चकमकींमध्ये सुमारे 98 लोक मारले गेले. त्यानंतर आता बांगलादेशचे लष्करप्रमुख वाकर-उझ-झमान राष्ट्राला संबोधित करणार आहेत. या निदर्शनात मृतांची संख्या 300 वर पोहोचली आहे. पंतप्रधान शेख हसिना यांच्या आजवरच्या 15 वर्षांच्या राजवटीतील हा सर्वात वाईट काळ हा ठरला आहे. देशात अशांतता जोर पकडत आहे. संपूर्ण बांगलादेशात निदर्शने होत असून सरकारविरोधी चळवळ वाढली आहे. दरम्यान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता देशाती सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत बांगलादेशातील विद्यार्थी सोमवारी राजधानी ढाका येथे लाँग मार्चसाठी जमले आहेत. वृत्तानुसार, या आंदोलनाचे समन्वयक आसिफ महमूद म्हणाले की, ‘या सरकारने अनेक विद्यार्थ्यांची हत्या केली आहे. आता वेळ आली आहे की सरकारला त्यांच्या कृत्याचा हिशोब द्यावा लागेल.’ विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. ते म्हणाले की, आम्हाला मोर्चा काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. माझ्या सैन्य बांधवांना सांगायचे आहे की, हुकूमशहांना पाठिंबा देऊ नका. एकतर तुम्ही लोकांना पाठिंबा द्या किंवा निष्पक्ष रहा. यासोबतच या मुदतीत बंद झालेली सर्व विद्यापीठे पुन्हा सुरू करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटमही सरकारला देण्यात आला आहे.
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशची राजधानी ढाका सोडली असून हसीना अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. ढाक्यातील पंतप्रधान निवासस्थानी हजारो आंदोलक घुसले असून शेख हसीना त्यांच्या बहिणीसोबत अज्ञात स्थळी रवाना झाल्या आहेत. यानंतर थोड्याच वेळात बांगलादेश लष्करकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.