India Pakistan war : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. याबरोबरच पाकिस्तानकडून भारताच्या काही ठिकाणी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. उधमपूरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरसह राजस्थानच्या जैसलमेर, बाडमेरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. यावेळी भारतानेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. गुजरातच्या कच्छमधील सीमावर्ती भागातही पाकिस्तानचे ड्रोन दिसले आहेत.
पाकिस्तानने 11 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याची माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत भारताच्या 9 शहरांमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे भारतीय लष्कराने हे ड्रोन पाडले आहेत. या घटनेनंतर शस्त्रसंधीचं काय झालं? असा सवालही जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे.
अमेरिकेने मध्यस्ती करून युद्धबंदी घडवून आणली. याबाबतची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली होती. दोन्ही देशांकडून फायरिंग, लष्करी कारवाया, हवाई आणि सागरावरुन होणाऱ्या कारवाया आज 5 वाजल्यापासून थांबवल्या जातील. असे सांगण्यात आले होते. मात्र पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारताच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली आहे. अवघ्या तीन तासानंतर पाकिस्तानने आपले छुपे मनसुबे दाखवायला सुरुवात केली आहे.