नवी दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये आता मुघल आणि दिल्लीतील तत्कालीन राजवटीची माहिती वगळण्यात आली आहे. तसेच भारतीय राजवंशांवरील प्रकरण; त्याचबरोबर ‘महाकुंभमेळ्या’चे संदर्भ आणि ‘मेक इन इंडिया’सह ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसारख्या शासकीय अभियानांचा समावेश एनसीईआरटी च्या पुस्तकात केला गेला आहे.
या आठवड्यामध्ये नवीन पाठ्यपुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) आणि ‘नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन 2023 ’च्या अनुषंगाने तयार केली आहेत. त्यानुसार शालेय शिक्षणात भारतीय परंपरा, तत्त्वज्ञान, ज्ञानप्रणाली आणि स्थानिक संदर्भसमाविष्ट करण्यात आला आहे.
प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा हा केवळ पहिला भाग आहे. दुसरा भाग येत्या काही महिन्यांत येणे अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीईआरटीने याअगोदर ‘मुघल’ आणि ‘दिल्ली सल्तनत’ यावरील माहिती कमी केले होते. 2022-23 मध्ये कोरोनामध्ये मामलुक, तुघलक, खिलजी आणि लोदी यांसारख्या राजवंशांचे तपशीलवार वर्णन आणि मुघल सम्राटांच्या कामगिरीवरील दोन पानांचा तक्ताही कमी करण्यात आला होता, पण नवीन पाठ्यपुस्तकामध्ये हे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आले आहेत.