नवी दिल्ली : नवी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटकल अफेअर्सच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. झालेल्या बैठकीत मोदी सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली.
भारतात दर दहा वर्षांनी जनगणना होते. 2011 नंतर 2021 ला जनगणना होणं अपेक्षित होतं, परंतु तेंव्हा करोनाचा उद्रेक झाल्यामुळे जनगणना केली गेली नव्हती. मात्र, आता लवकरच जातनिहाय जनगणना होणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसनं केवळ सर्वेक्षण केलं असं म्हटल आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले..
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेचा आगामी जनगणनांमध्ये समावेश केला जाणार आहे. यावर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आल्याचं मानला जात आहे.
यावेळी बोलताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतात 1947 नंतर जातनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही. काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेऐवजी केवळ जातनिहाय सर्वेक्षणच केलं आहे. मात्र आता जात निहाय जनगणनेला आगामी काळातील जनगणनेत समाविष्ट केलं जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.