जयपूर: राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री भजनलाल शर्मा असतील. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा निर्णय झाला आहे. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी वसुंधरा राजे यांना चिट्टी दिली होती. ज्यामध्ये राजस्थानच्या पुढील मुख्यमंत्र्याचे नाव लपल्याचे मानले जात होते. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भजनलाल यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. भजनलाल शर्मा हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस होते आणि ते सांगानेरचे आमदार आहेत. तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले असून वासुदेव देवनानी विधानसभा अध्यक्ष असतील.
तत्पूर्वी, मंगळवारी सायंकाळी चार वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू झाली. या बैठकीत राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. या बैठकीत भाजपचे केंद्रीय निरीक्षक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि दोन सहनिरीक्षक विनोद तावडे आणि सरोज पांडे उपस्थित होते. याआधी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रल्हाद जोशी आणि दोन सहनिरीक्षक विनोद तावडे आणि सरोज पांडे हे विशेष विमानाने जयपूरला पोहोचले होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले