बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथील महालक्ष्मी हत्याकांडाचे गूढ अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. 29 वर्षीय महालक्ष्मीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली. बंगळुरूच्या व्यालिकवल परिसरात शनिवारी (दि. 21 सप्टेंबर) ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी मुक्तिरंजन प्रताप रॉयचा मृतदेह ओडिशात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. आरोपीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे 50 हून अधिक तुकडे करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याचा आरोप त्याच्यावर होता. महालक्ष्मीच्या हत्येनंतर संशयित मुक्ती रॉय ओडिशात लपून बसल्याचे बोलले जात होते. आरोपी मुक्ती रंजन रॉयने मंगळवारी सकाळी कुळेपाडा स्मशानभूमीजवळ स्कूटरवर लॅपटॉप ठेवून गळफास लावून घेतल्याचे म्हटले जात आहे. कुटुंबीयांना त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली असून पोलीसांनी तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
महालक्ष्मीची निर्घृण हत्या करणारा मुक्तिरंजन वेगवेगळ्या ठिकाणांहून ओडिशात पोहोचल्याची माहिती बंगळुरु पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून बंगळुरु पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी ओडिशाला गेले होते, मात्र पोलिसांना त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात त्याने महालक्ष्मीची हत्या केल्याची कबुलीही दिली आहे.
दरम्यान, आरोपी रॉय यांच्या मृत्यूनंतरही तपास सुरूच राहण्याची शक्यता आहे. महालक्ष्मीची हत्या का झाली आणि त्यात इतर लोकांचाही सहभाग होता का, हे पोलिसांना जाणून घ्यायचे आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या या महालक्ष्मी हत्या प्रकरणाचे कारण अद्याप तरी गूढच राहिले आहे.