Israel–Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. इस्रायल आणि हमासमधील युद्ध अद्याप चालू आहे. एकीकडे दोन्ही देशांमधील युद्धविरामाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे इस्रायलने रविवारी हमासच्या गाझापट्टीतील २०० हून अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत १६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जखमी झाले आहेत.
युद्धात इस्रायलचे १४ सैनिकही मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यादरम्यान हमासच्या तळांचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. हमासच्या स्थानांवरून सैनिकांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला असल्याचं इस्रायलने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गाझामधील एका इमारतीत हमासने मोठा हल्ला करण्यासाठी शस्त्र लपवून ठेवली होती अशी माहिती आहे.
इस्रायली सैन्याने २४ डिसेंबरला या इमारतीला घेराव घालून त्यांनी झडती घेतली, यादरम्यान त्यांनी डझनभर स्फोटके, शेकडो ग्रेनेड आणि गुप्तचर कागदपत्रे जप्त केली. ही इमारत शाळा, दवाखाना आणि मशिदीच्या शेजारी होती. इस्त्रायली सैन्याने सांगितले की, दराज-तुफाहमधील कारवाईदरम्यान एका शाळेची झडती घेण्यात आली, त्या शाळेतून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहात. यामध्ये हमासच्या नौदल कमांडो युनिटशी संबंधित रॉकेट आणि इतर उपकरणांचा देखील समावेश होता.
उत्तर गाझामधील दुसर्या ऑपरेशन दरम्यान, इस्त्रायली सैनिकांना हमासचे काही दहशतवादी एका इमारतीत लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर लष्कराने या इमारतीवर बॉम्ब टाकत हल्ला चढवला. या हवाई हल्ल्यात इमारत कोसळली. दरम्यान, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की याच काळात इस्रायली हल्ल्यात किमान १६६ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तर ३८४ जखमी झाले आहेत. युद्धादरम्यान १४ इस्रायली सैनिकही मारले गेले आहेत.