महेंद्रगड: हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना उपविभागातील उनहानी गावात स्कूल बस उलटून 8 मुलांचा मृत्यू झाला. तर 14 मुले जखमी झाली. अपघाताची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बसचा चालक दारूच्या नशेत होता. बसमध्ये जवळपास 33 मुले प्रवास करत होते. गुरुवारी शासकीय सुट्टी असूनही शाळा सुरू होत्या. ही बस जीएल पब्लिक स्कूल या खासगी शाळेची होती.
मद्यधुंद चालकाने थेट झाडाला धडक दिल्याने बस उलटली. यानंतर घटनास्थळी आरडाओरडा झाला. पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. स्थानिक लोकांनी मुलांना बसमधून बाहेर काढले. माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलांना रुग्णालयात पाठवले.
कनिना ते धनौंडा या मार्गावर शासकीय कन्या महाविद्यालयासमोर बस उलटली. बस चालकाने थेट झाडाला धडक दिल्याने बस उलटली. बसमध्ये एकूण 33 मुले प्रवास करत होती. घटनास्थळी उपस्थित लोकांनी जखमी मुलांना निहाल हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. निहाल हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी कौशिक यांनी सांगितले की, त्यांच्याकडे 20 मुले आली होती, त्यापैकी पाच मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. उर्वरित जखमींना प्राथमिक उपचारानंतर उच्च केंद्रात पाठवण्यात आले आहे. जखमींना रोहतक पीजीआय आणि महेंद्रगड येथे पाठवण्यात आले आहे.