नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या देशव्यापी ऑनलाइन सदस्यत्व मोहिमेद्वारे अवघ्या २० दिवसांत २ लाखांपेक्षा जास्त महिलांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेतले असल्याची माहिती अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी शनिवारी येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
अलका लांबा यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना न्याय मिळवून देण्यावर पक्षाने लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले. सध्या सुरू असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा संदर्भ देत लांबा यांनी, महिलांसाठी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय यावर विशेष लक्ष केंद्रित करून सदस्यत्व मोहिमेच्या पाच मुख्य उद्दिष्टांच्या महत्त्वावर भर दिला.
हरियाणातील निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या महिलांच्या संख्येवर समाधान व्यक्त करताना अलका लांबा म्हणाल्या, आपण मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या अनेक महिला पाहत आहोत. हरियाणातील पक्षाच्या प्रचारादरम्यान महिलांच्या चिंता या राज्यात राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्याच्या काँग्रेसने दिलेल्या आश्वासनाशी सुसंगत आहेत. यामुळे महिलांना राजकीय न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. हरियाणा विधानसभा निवडणुकीत ९० मतदारसंघांतून १२ महिला उमेदवार रिंगणात आहेत, असेही त्या म्हणाल्या.
देशाची कन्या विनेश फोगाट दिल्लीच्या दारात न्याय मागत राहिली, मात्र पंतप्रधान मोदींनी तिला भेटण्यासाठी वेळही दिला नाही. दिल्ली पोलिसांना त्यांची एफआयआर नोंदवण्यापासून रोखले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एफआयआर नोंदवण्यात आला, परंतु अद्याप तिला न्याय मिळालेला नाही. विनेश फोगाट हिंमत हारली नाही, म्हणून काँग्रेस पक्षाने तिचा हात धरला, जेणेकरून ती न्यायासाठी लढत राहू शकेल, असे त्या म्हणाल्या.