विरार : राज्यभरात हिट अँड रनच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे. विरारमध्ये भरधाव फॉर्च्यूनर कारने धडक दिल्याने एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. सदर अपघात प्रकरणी शुभम पाटील या चालकाला पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला दिसून येत आहे.
आत्मजा कासाट (46) असे अपघातात मृत्यू पावलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. आत्मजा कासट या विवा जूनियर कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.1 ऑगस्ट) रोजी महाविद्यालय सुटल्यावर आत्मजा या विरार पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशीप येथील आपल्या घरी जात होत्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या घरी परतत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांना धडक दिली. यात त्या दुभाजकावर फेकल्या गेल्या होत्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला.
आरोपी शुभम पाटील (24) नावाचा तरुण यावेळी कार चालवित होता. शुभम दारुच्या नशेत कार चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. रात्री उशीरा अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस 2023) च्या 105 आणि 281 कलमांतर्गत तसेच, मोटर वाहन अधिनियम 1988 च्या कलम 184 आणि 185 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.