मुंबई : गिरगावामध्ये एका किराणा दुकानदाराकडून मराठी ग्राहक महिलेला आता भाजपचे सरकार आले आहे, माझ्याशी मारवाडीत बोला असे सांगण्यात आले. त्यानंतर संतप्त झालेल्या महिलांनी या दुकानदाराची तक्रार भाजपसोबतच मनसेकडे केली. मराठी माणसाला मारवाडी बोलण्याचा आग्रह करणाऱ्या दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी खेतवाडीतील कार्यालयात बोलवून चांगला चोप दिला आहे. इतकेच नाही तर त्या दुकानदाराला महिलेची माफी मागण्यास सांगितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरगावातील खेतवाडी परिसरात एका मारवाडी व्यापाऱ्याकडून मराठीत का बोलल्या? असा जाब विचारण्यात आला. तसेच आता या पुढे महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे मारवाडीतच बोलायचे मराठीत बोललले आम्ही सहन करणार नाही. अशा प्रकारचे वक्तव्य केले. महिलेने मनसेकडे तक्रार केल्यानंतर दुकानदाराने क्षमा सुद्धा मागितली.
नेमकं काय घडलं?
संबंधित महिला सोमवारी संध्याकाळी 7 वाजता महादेव स्टोअर्समध्ये काही किराणा आणण्यासाठी गेली. सामानाची मागणी तीन वेळा मराठीत केली. परंतु दुकानदार मला म्हणाला, बीजेपी आया है, मारवाडी मे बात करने का? मुंबई भाजप का, मुंबई मारवाडी का! असे म्हणाला. त्यानंतर महिला मनसेकडे मराठी बांधवांच्या वतीने न्याय मागणीसाठी गेले होते.
आमदार मंगलप्रसाद लोढांकडून महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष..
संबधित महिला मारवाडी दुकानदाराची तक्रार घेऊन आमदार मंगलप्रसाद लोढा यांच्याकडे सुद्धा गेली होती. त्यावर आमदार लोढांनी हमारे मे झगडा लगाने काम कर रहे हो, असे उद्धट उत्तर दिल्याचे महिलेने सांगितले. ज्या लोढांना दक्षिण मुंबईत आम्ही निवडून आणले, ते आम्हाला म्हणतात मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही आमच्या मलबार हिलचे आमदार आहात तर तुम्हाला ओळख पाहिजे का? असे देखील महिला म्हणाली.
मराठी माणसाचा अपमान सहन करणार नाही..
‘मला माफ करा, माझी चूक झाली इथून पुढे मी मराठीतच बोलेल’ असे म्हणत दुकानदाराने मराठी भाषिकांची आणि राज ठाकरेंची माफी मागितली. परप्रांतीय लोकांची दादागिरी महाराष्ट्र अजून किती वर्ष खपवून घेणार, मराठी माणूस सहनशील आहे, मराठी माणसाने कधीच कोणाचा अपमान केलेला नाही. त्यामुळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच सहन करणार नाही, असे मनसेने म्हटले आहे.