मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला त्याविरोधात आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात याचिका दाखल केली आहे. १० जानेवारी रोजी राहुल नार्वेकरांनी खरी शिवसेना मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे सांगितले होते.
मे २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं. तसंच, मर्यादित कालावधीत याबाबतचा निकाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, या सुनावणीला जून महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्षात सुरुवात झाली. सुनावणीला वेग यावा आणि लवकर निकाल लागावा म्हणून ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पुन्हा मर्यादित काळात निकाल देण्याचे आदेश दिले. त्यानुसार, १० जानेवारी रोजी निकाल लागला.
राहुल नार्वेकरांनी २०१८ सालची शिवसेनेची घटनादुरुस्ती अवैध ठरवून उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पदही अमान्य केले होते. तसंच, १९९९ ची पक्षघटना आणि बहुमताच्या आधारे शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचे मान्य केले होते. त्याशिवाय शिंदे गटातील १६ आमदार पात्र ठरवले. तसेच, ठाकरे गटाच्याही १४ आमदारांनाही पात्र ठरवले होते.
राहुल नार्वेकरांच्या या निकालाविरोधात आता ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. हे प्रकरण राहुल नार्वेकरांकडे सुपूर्द करतानाच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, राहुल नार्वेकरांच्या निकालातून न्याय मिळाला नसल्याचे जाणवल्यास याचिकाकर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. त्यानुसार, उद्धव ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.