200 मृत कोविड रुग्ण जिवंत दाखवून पैसे उकळल्याचे भाजप अमादारावरचे आरोप गंभीरतेने घ्या, न्यायालयाच्या पोलिसांना सूचना
मुंबई : भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी कोविड काळात 200 हून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप करत मायणी येथील दीपक देशमुख यांनी गोरे यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या भ्रष्टाचारांच्या आरोपांना गंभीरतेनं घ्या अशा सक्त सूचना मुंबई उच्च न्यायालयाने सातारा पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत.
आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात इतर सहभागी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी दीपक देशमुख यांनी या याचिकेतून केली आहे. सरकारने मोफत कोरोना उपचारासाठी सर्व कोविड सेंटर आणि रुग्णालयांना मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा विनामुल्य देण्याकरता पुरवला होता. मात्र, आमदार गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोविड काळातील या संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली करण्याची मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाकडून या याचिकेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
साताऱ्यातील मायणी-खटाव येथे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्स सेंटर आहे. हे सेंटर जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना रुग्णाचे उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष भाजपचे आमदार जयकुमार गोरे हे होते. त्यावेळी डॉक्टरांच्या खोट्या सह्या, बनावट कागदपत्रं वापरून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात भाजप आमदार गोरे यांनी 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटले. तसेच विविध सरकारी योजनांतून निधी मिळवण्यात आला. सरकारने मोफत कोरोना उपचारांसाठी सर्व रुग्णालय, कोरोना सेंटरना मोठ्या प्रमाणावर औषध व इंजेक्शन दिली होती. मात्र,आमदार गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.
एवढंच नाही तर याप्रकरणी जयकुमार गोरे आणि त्यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्यासह घोटाळ्यात सहभागी असलेल्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.