मुंबई : मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेदरम्यान उत्तेजक द्रव्य घेऊन मैदानी परीक्षेसाठी आलेल्या एका उमेदवाराविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू असून त्यानंतर उमेदवारावर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य पोलीस दलातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, पोलीस चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, वाद्यवृंद पथक पदाच्या एकूण १७ हजार ४७१ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी तब्बल १७ लाख ७६ हजार २५६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरती प्रक्रियेदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये. तसेच गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या एसआरपीएफच्या मैदानात सुरू असलेल्या मैदानी परीक्षेसाठी गुरुवारी ३७४ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यावेळी प्रत्येक उमेदवारासह त्यांच्याकडील सामानाची कसून तपासणी करत उमेदवारांना मैदानी परीक्षेसाठी आतमध्ये सोडले जात होते. याचदरम्यान एका उमेदवाराच्या बॅगेत येथे कर्तव्य बजावत असलेल्या एसआरपीएफच्या अधिकाऱ्याला स्टेराईड आणि एका खासगी कंपनीचे इंजेक्शन सिरीज सापडले.
भरतीवेळी धावताना स्टॅमिना राहावा आणि पायात गोळे येऊ नये, म्हणून या उमेदवाराने ते उत्तेजक द्रव्य त्याच्यासोबत आणले होते. ही माहिती अधिकाऱ्याने त्याच्या वरिष्ठांना देत उमेदवाराविरोधात वनराई पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार संबंधित उमेदवाराविरुद्ध उत्तेजक द्रव्य बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत तो दोषी आढळल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे.