मुंबई : बहिणीच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत. या बहिणींना लखपती बहिणी करण्याचे काम शासन करणार आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कांजूरमार्ग येथे १२८ कोटी रुपये खर्चातून मुंबई महानगपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नेहरूनगर कांजूरमार्ग येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार नरेश म्हस्के, नगरसेविका सुवर्णा करंजे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महानगपालिकेच्या या रुग्णालयासाठी १२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शासनाने विविध रुग्णालयामध्ये कॅशलेस सुविधा देखील सुरू केली आहे. यासह महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. लेक लाडकी योजना, मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजनांमुळे महिलांना सक्षम होण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद होणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.