Sindhudirg Submarine Project : मुंबई : सध्या महाराष्ट्रातील काही मोठे प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यात आता पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गातून हलणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गटाने) महाराष्ट्रातील पहिलं पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून गुजरातला हलणार असल्याचा आरोप केला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, ”खोट्या बातमीकांवर विश्वास ठेवू नका. हा आपल्या राज्याचा प्रकल्प आहे, तो राज्यातून बाहेर जाणार नाही.” असं स्पष्टपणे सांगत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे.
गुजरातला सोन्यानं मढवून द्वारका करा
संजय राऊतांनी म्हटलं आहे की, ”आतापर्यंत महाराष्ट्रातून 17 महत्वाचे प्रोजेक्ट्स गुजरातमधे गेले. गेल्या दीड वर्षात गुजरातमधे वेगवेगळे महत्वाचे प्रोजेक्ट्स खेचून नेले. मुंबईतील उद्योजकांमधे दहशत पसरवून त्यांना घेऊन जातायत. मी म्हणतो त्यांनी गुजरातला सोन्यानं मढवून द्वारका करा, आमचं काहीच म्हणणं नाही. आधी गुजरातचा विकास आणि मग देशाचा विकास अशी भाषा देशाचे पंतप्रधान करतात, असं कुणीच कधी बोललं नाही.”
प्रकल्प राज्यबाहेर जाऊ देणार नाही
”संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ”पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला गेल्याची बातमी कन्फर्मेशन नाही, पण एक उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. त्याची चर्चा होताना दिसत नाही. मागे हिऱ्याचा उद्योग गुजरातला गेला असल्याचं सांगितलं गेलं. प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील.”
तयारी राज्याची आणि प्रकल्प गुजरातला
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की, ”तयारी राज्याने करायची आणि प्रकल्प गुजरातने न्यायचे आणि जे लोक आहेत, राणे, सामंत केसरकर यांना फक्त आमच्यावर टीका करायची काम आहे. यांच्या बुडाखालचा पाणबुडी प्रकल्प गेला, हे आपल्या दृष्टीने हीतवाह नाही. रिफायनरी नाही न्यायची, फक्त ज्यातून फायदा ते नेतात, हे सरकार असेपर्यंत हीच परिस्थिती राहील. कारण, गुजरातच्या लोकांसमोर आपल्या नेत्यांची तोंड उघडत नाही.