मुंबई : सध्या राज्यभर गणेशोत्सवात नागरिक आनंदून गेले आहेत सगळीकडे चैतन्याचे वातावरण आहे. परंतु मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मुंबईतील गिरगावमधील एका गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात 13 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी आरोपीला व्ही. पी. रोड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंग, पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात लपंडाव खेळत असलेल्या 13 वर्षीय मुलीसोबत 59 वर्षीय व्यक्तीने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली असून मुलगी भाऊ आणि मित्र-मैत्रिणीसोबत लपंडावचा खेळ खेळताना लपण्यासाठी ती मंडपात गेली. यादरम्यान आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगताच त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली आहे.