कल्याण: उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये हा गोळीबार झाला आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. आता या प्रकरणी काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. गोळीबारप्रकरणी आमदार गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळत आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार केला आहे. या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आरोपी आमदार गणपत गायकवाड यांना व्हीसीद्वारे कोर्टात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड देखील आरोपी आहे. पोलीस त्याचा देखील कसून शोध घेत आहेत
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय ?
हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये आमदार गणपत गायकवाड, महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे इतरांसोबत होते. या दोन्ही गटात बसून सुरू असलेल्या चर्चेत अचानक वातावरण तापले. आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पिस्तुल काढून गोळीबाराला सुरूवात केली. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना या गोळीबारात गोळ्या लागल्या असून ते यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबाराचा आवाज ऐकल्या नंतर तातडीने एका पोलिसाने आत धाव घेतली. त्यानंतर आमदार गायकवाड हे महेश गायकवाडला मारहाण करत होते. त्यांना रोखण्याचा पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्न केला. दरम्यान त्याचवेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनीही आत धाव घेतली. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांशी तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या उचलून कार्यकर्त्यांची हाणामारी झाली.
गोळीबारातील जखमी दोघांपैकी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक तर त्यांचा सहकारी राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. श्रीकांत शिंदे यांनी जखमींची भेट घेतल्यानंतर महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची माहिती दिली. महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर असून व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या शरीरामधून सहा गोळ्या बाहेर काढल्या. तर राहुल पाटील यांच्यावर रात्री तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या ते अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व चे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या सह साथीदारांवर भर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केल्याचे cctv फुटेज वायरल… pic.twitter.com/oZ3oggLTga
— Pune Prime News (@puneprime_news) February 3, 2024