मुंबई : निवडणूक आयोगाने मशाल गीतामधून ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ हे दोन शब्द हटवण्यास सांगितलं आहे. पण, जय भवानी हा शब्द गीता मधून काढणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले असून निवडणूक आयोगाने बजावलेली नोटीस धुडकावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उघड-उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरु असल्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंनी यावेळी दाखवला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर कारवाई का नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे आणखी विचारणा केली होती, पण त्यावर उत्तर आलेलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आमच्या मशाल चिन्हाच्या गीतामध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ असं एक कडवं आहे. त्यातील जय भवानी हा शब्द हटवण्याचा फतवा निवडणूक आयोगाकडून काढण्यात आला आहे. मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीत ‘जय भवानी’ हा शब्द हटवणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तसेच आमच्यावर कारवाई करणार असाल तर मोदी-शहा यांच्यावरही तुम्ही कारवाई करणार आहात का? हे आम्हाला सांगावं. मोदी-शहांमध्ये महाराष्ट्रातील देवांबाबत इतका द्वेष आहे हे आता कळत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाकडे तक्रार नाही, तर विचारणा केली होती. अटलजी पंतप्रधान असताना बाळासाहेबांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घेतला होता. ६ वर्ष त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. धर्माच्या नावावर भाजप निवडणुका लढवत आहेत. त्यांना सुट देण्यात आली आहे का? असं सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केला.
पुढे बोलताना म्हणाले, आमचं सरकार आणल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, असं अमित शाह म्हणाले. बजरंग बलीचं नाव घेत पंतप्रधान मोदींनी प्रचार केला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर आधी कारवाई करा, असं उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून म्हटलं आहे. भवानी माता सर्व जनतेची माता आहे, तिचं स्मरण करण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. आमच्या गीतातून धार्मिक प्रचार होत असेल, तर मोदी आणि शाहांच्या धार्मिक प्रचार करणाऱ्या वक्तव्यावर आधी कारवाई करा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे.