मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या आधी सोमवारी दुपारी ठाकरे गटानेही या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत, त्यामुळे आमचा व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या त्या 14 आमदारांचं निलंबन का करण्यात आलं नाही असा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे सिद्ध होतेय तर त्यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही? असा प्रश्न या याचिकेतून करण्यात आला आहे. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला गोगावलेंच्या याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे.
ठाकरे गटही सर्वोच्च न्यायालयात
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील आपला निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी बहुमताच्या आधारे शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचे सांगितले. तर शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांचीच नियुक्ती योग्य असल्याचे सांगत ठाकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरवली. तसेच त्यांनी आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाकडून आलेल्या याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र ठरवलं नाही.