पुणे प्राईम न्यूज: 2019 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीच आम्हाला सूचवली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला होता. फडणवीस यांच्या या खुलाशावर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना ही शरद पवार यांनीच भाजपला सूचवली होती. तेव्हा ठरल्याप्रमाणे ती लागू करण्यात आली.यावेळी शरद पवार आम्हाला म्हणाले होते की, मी एवढ्या लवकर युटर्न घेऊ शकत नाही. तुम्ही सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू करा. त्यानंतर मी संपूर्ण राज्याचा दौरा करून राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेईल. यानंतर आपल्याकडे पुरेसे संख्याबळ झाल्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
“भाजपाच्या आमदारांची संख्या जास्त”
यावर ‘इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, “आम्ही सत्तेत नव्हतो. भारतीय जनता पक्ष सत्तेत होता. त्यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त होती. राज्यात भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय देखील त्यांचाच होता. जर भारतीय जनता पक्षाकडे बहुमत होतं, तर त्यांनी मला का विचारालं? भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय का घेतला?”
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर चर्चा सुरू होती, असा दावा देखील देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. याबद्दल बोलताना शरद पवारांनी म्हटलं, “ही पूर्ण चुकीची माहिती आहे. फक्त प्रश्न हाच आहे की, भाजपाकडे बहुमत असताना ते माझं का ऐकत होते?”