मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरेलल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली मुंबईमध्ये अडीच हजार जणांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी हे गुजरातच्या सुरत शहरातून रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक करणारा आरोपी हा गुजरातमधील सूरतमधील असून त्याने मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना लक्ष्य केलं. मुंबईतील नेहरु नगर, डी.एन. नगर, धारावीमधील नागरिकांना या टोळीने गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दर महिन्याला तुम्हाला ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दीड हजार रुपये मिळतील असं सांगून या टोळीने अनेकांच्या नावाने बँक खाती सुरु केली.मात्र आरोपींनी नंतर ही खाती सायबर गुन्हेगारांना आणि मनी लॉन्ड्रींग करणाऱ्या आरोपींना विकली.दरम्यान नेहरुनगरमध्ये राहणारा 22 वर्षीय मजूरी करणारा वलिक सय्यद खान याने या प्रकरणामध्ये विले-पार्ले पश्चिम येथे तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला.त्यानंतर जुहू पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.
झोपडपट्टीतील लोकांना लाडकी बहीण योजनेचे आमिष दाखवून त्यांचे बँक खाते उघडले जात होते. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.या घोटाळेबाजांनी मुंबईमधील वेगवेगळ्या भागातील अडीच हजार जणांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे गुजरातमधून 2500 मुंबईकरांना हा गंडा घालण्यात आला आहे.जुहू पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये काही बँकांनी व्हेरिफिकेशन आणि इतर पात्रता तपासून पाहिली नाही. खास करुन चाळीत राहणाऱ्या खात्यांचं व्हेरिफिकेशन झालं नाही. पोलिसांनी आतापर्यंत 100 हून अधिक खाती बंद केली आहेत
. विशेष म्हणजे नावाप्रमाणे ‘लाडकी बहीण’ योजना ही महिलांसाठी असतानाही अनेक पुरुषांच्या नावानेही खाती सुरु करण्यात आली होती. तुम्हालाही या योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये मिळतील असं फसवणूक करणाऱ्या टोळीनं सांगितलं होतं.