मुंबई : पेपर फूटीप्रकरणावरून आणि आमदार अपात्रता प्रकरणावरून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला. एकीकडे तलाठी भरतीचा महाघोटाळा चर्चेत आहे. त्याचवेळी बुधवारी पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा गलथान कारभार समोर आला. यावरून आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली, तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का? असा घणाघात रोहित पवार यांनी सरकारवर केला.
रोहित पवार काय म्हणाले ?
रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तलाठी भरतीतील गैरप्रकार ताजा असतानाच काल पुन्हा सारथी, बार्टी आणि महाज्योतीमार्फत पी.एचडी फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचाही पेपर फुटला. आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा, ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी पुढे म्हटले की, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी मुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतोय. त्यामुळं पेपरफुटीवर कडक कायदा करा. युवकांनी ही मागणी किती वेळा करायची? युवकांना जेव्हा तुम्ही सिरीयस होण्याचा सल्ला देतात तेव्हा आपल्या जबाबदारीबाबत आपण सिरीयस होणार की नाही?
तलाठी भरतीसंदर्भात टीका
रोहित पवार यांनी तलाठी भरती आणि सर्व भरतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. भाजप सरकारमध्ये हेच सुरू आहे. कोणी लक्ष देत नाही. हा मुद्दा मुलांनीच पुढे आणला आहे. या प्रकरणी आम्ही चौकशीची मागणी करत आहोत. परंतु विखे पाटील यांनी आमच्यावर काही कारवाई करायची असेल तर करा, असे आव्हान त्यांनी दिले. त्याशिवाय, नागपूर, पुणे, संभाजीनगर या केंद्रावर पीएचडी फेलोशिप पेपर फुटीचे प्रकरण समोर असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने नागपूरमध्ये आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले. त्यामुळे अभविपने सक्करदरा पोलिस स्टेशनसमोर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली याचाही दाखला त्यांनी दिला.