पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ बनसोडे यांचा अर्ज आला होता. आज मंगळवारी (दि. 25) दुपारी त्यांचा अर्ज पडताळणीत वैध ठरला आहे. उद्या बुधवारी (दि. 26) सभागृहात विधानसभा उपाध्यक्ष पदावर अण्णा बनसोडे यांची नियुक्ती झाल्याची अध्यक्षांकडून घोषणा केली जाणार आहे.विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
दरम्यान विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडेयांचे नाव तर चर्चेत होतेच. परंत, त्यांच्या नावाशिवाय लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे, तसेच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावे चर्चेत होती. मात्र, अखेर आमदार बनसोडे यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत.
कोण आहेत आमदार अण्णा बनसोडे?
आमदार अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. बनसोडे हे 2009 मध्ये पहिल्यांदा आमदारपदी विराजमान झाले होते. त्यानंतर 2019 आणि 2024 असे सलग दोनवेळा निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी बाजी मारली. अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातील पिंपरीचे शिलेदार म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे.