मुंबई: डोंबिवलीतुन धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील चर्चित रीलस्टार आणि बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटीलच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील एका तरुणीला मुंबई एअरपोर्टवर एअरहोस्टेसची नोकरी मिळवून देण्याचे आमिष देऊन तसेच तिच्यावर बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केल्याचा तरुणीने आरोप केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सुरेंद्र पाटील पसार झाला आहे. मानपाडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार
दिलेल्या तक्रारीनुसार, रीलस्टार सुरेंद्र पाटील याने तरुणीला मुंबई एअरपोर्टवर एअरहोस्टेसची नोकरी मिळवून देण्याचे आमिष देऊन तिला कागदपत्रांसह डोंबिवलीमधल्या आपल्या कार्यालयात बोलावले. तरुणी तेथे गेल्यानंतर तिला एका खोलीत नेले आणि बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर त्याने बलात्कार केला. घडलेल्या प्रकारची वाच्यता कुठे केल्यास तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. काही दिवसांनंतर, पुन्हा तिला कागदपत्रांसाठी बोलावून त्याने बलात्काराचा प्रयत्न केला. विरोध केल्यानंतर तिच्यावर चोरी केल्याचा आरोप केला. त्याच्या ड्रायव्हरने देखील पीडित तरुणीची छेडछाड केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, सुरेंद्र पाटील पसार झाला आहे. मानपाडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.