नवी दिल्ली, पुणे प्राईम न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीसंदर्भात 6 ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगात शुक्रवारी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. शरद पवार यांच्या गटाकडून तब्बल हजार शपथपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा वाद उभ्या महाराष्ट्राने बघितला आहे. आता उद्यापासून अजून एक वेगळी मोठी लढाई सुरू होणार आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबत पहिली सुनावणी पार पडणार आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून या संदर्भात तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी शरद पवार गटाने दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये विस्तारित कार्य समितीची एक बैठक सुद्धा बोलवण्यात आलेली आहे. जर आयोगाकडून पक्षाचं निवडणूक चिन्ह गोठवलं गेलं किंवा जर आपल्या विरोधात निर्णय आला त्याचे काय विपरीत परिणाम होणार? पुढे नेमके कोणते पाऊल उचलायचे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे.
शरद पवार गटाकडून नऊ हजार शपथपत्र दाखल
शरद पवार यांच्या गटाकडून जवळपास नऊ हजार शपथपत्र दाखल करण्यात आली हे. त्यांचा दावा आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार गटापेक्षा कागदपत्रांची संख्या जास्त आहे. अजित पवार यांच्या गटाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही दोष सुद्धा शरद पवार गट निवडणूक आयोगाला दाखवणार आहेत. अजित पवार गटाच्या कागदपत्रांमध्ये काही मृत व्यक्तींच्या नावाने शपथपत्र दाखल केली गेली आहेत. तसेच काही शिक्षण संस्थांचे कर्मचारी आहेत, जे सरकारी नोकरीला आहेत त्यांचे सुद्धा शपथपत्र दाखल करण्यात आल्यचा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
6 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाची बाजू मांडणार आहेत. पक्षाच्या स्वत: नेत्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची गरज नाही. उद्यापासून निवडणूक आयोगात सुरू होणाऱ्या लढाईत पहिला निर्णय काय येणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.