Lok Sabha Election मुंबई: आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास अवघ्या काही महिन्यांचा अवधी बाकी असताना राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून बावनकुळे यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ‘एबीपी माझा’च्या एका कार्यक्रमात बोलताना बावनकुळे यांनी ही घोषणा केली.
अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहारचे दोन आमदार असल्याचे सांगत बच्चू कडू यांनी आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली. त्याशिवाय विद्यमान खासदार नवनीत राणा यांना जर उमेदवारी हवी असेल तर त्यांनी प्रहारकडून लढावे, असंही आमदार कडू म्हणाले होते. त्यानंतर आता महायुतीतील एका प्रमुख पक्षाच्या अध्यक्षांनी नवनीत राणा या विजयी होतील, असं म्हटल्याने राणा यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी महायुतीच्या खासदार नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून 51 टक्के मतांसह विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीकडून नवनीत राणा या विजयी होतील, असे म्हटले असले तरी नवनीत राणा लढणार कोणत्या पक्षाकडून हा मोठा प्रश्न कायम आहे. राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा मध्यतंरी होती. तर, दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनीदेखील त्यांनी प्रहारच्या तिकीटावर निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे राणा यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी चिन्ह, पक्ष कोणता असणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.