मुंबई: महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती. ही योजना केंद्राच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ला जोडून शेतकऱ्यांना जास्त मदत देण्यासाठी आणली गेली. आतापर्यंत या योजनेचे ५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या काळासाठी सहाव्या हप्त्यासाठी सरकारने १६४२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) कृषी विभागाने जारी केला आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. यासाठी मंजूर १६४२.१८ कोटी रुपये आणि आधी शिल्लक असलेले ६५३.५० कोटी रुपये वापरले जाणार आहेत. हा सहावा हप्ता डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान आणि यापूर्वीच्या हप्त्यांमधील ठेरलेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी ही रक्कम वापरली जाईल. ही योजना पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत म्हणून २०२३-२४ पासून सुरू आहे. यातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये तीन हप्त्यांत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात. ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यातील ९१.४५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ९०५५.८३ कोटी रुपये जमा झाले आहेत.