मुंबई : मुंबई-पुणे प्रवास आता आणखी जलद होणार आहे. रेल्वे लवकरच दोन सविस्तर प्रकल्पाची आखणी करणार आहे. कर्जत ते लोणावळ्यादरम्यान दोन सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेने तयार केले असून ते रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आले आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. मुंबईवरून पुण्याला जाणारा सर्वाधिक वाहतूक असलेला हा मार्ग आहे. हा मार्ग झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पनवेल ते कर्जतदरम्यान नवीन रेल्वे मार्ग होत आहे. हा मार्ग लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. पनवेलमध्ये देशातील सर्वांत मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे कर्जत ते लोणावळा मार्गिका प्रवाशांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कर्जत-लोणावळा भागातील मार्गासाठी दोन प्रस्ताव तयार केले आहेत. तसेच नवीन मार्गावरोबरच नवी स्थानकेही उभारण्यात येणार आहे.
नवीन मार्गावर चढ-उतार नसल्याने रेल्वेला अतिरिक्त बँकर इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही. बँकर जोडण्यासाठी आणि काढण्यासाठी लागणारा २० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. तसेच या प्रकल्पात भुयारी मार्ग आणि पुलांचा समावेश असणार आहे. एकेरी बोगदे असून त्यातून दोन्ही मार्गिका जातील तर काही ठिकाणी दोन्ही मार्गिकांसाठी स्वतंत्र बोगदे असतील. सध्याचा मार्ग हा २६ किमीचा असला तरी नवीन मार्ग साधारण, दुप्पट लांबीचा असेल. हा मार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणेदरम्यान अतिरिक्त मार्गिका तयार होणार असून सेवांमध्ये वाढ करणे शक्य होणार आहे.
कर्जत ते तळेगावचाही रेल्वे बोर्डाला प्रस्ताव
कर्जत ते तळेगाव असा एक प्रस्ताव असून याची लांबी एकूण ६० किमी आहे. त्यात ४ बोगदे, एकूण २४ पूल आणि ६ स्थानके असणार आहेत तर कर्जत-खोरावडी असा दुसरा प्रकल्प असून तो मार्ग ६१ किमी आहे. यांत एकूण बोगदे ४ तर २० पूल असणार आहेत तर यात ६ स्थानके बांधण्यात येणार आहेत.