Mumbai News : मुंबई : दिवाळीआधी मुंबईच्या हवामानात वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्यानंतर एक दोन वेळा पाऊस झाला, आणि हवेतील वायू प्रदूषणात घट झाली. मात्र, त्यानंतर दिवाळी आल्याने प्रशासनाने नागरिकांनी ठरलेल्या वेळेत फटाके फोडण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याचे नागरिकांकडून उल्लंघन झाल्याने आता पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. मुंबई शहरात पाच दिवसांत सुमारे 1,134 नागरिकांवर बेकायदेशीरपणे फटाके फोडल्या प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मागील 2 दिवसात 350 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगर प्रदेशात हवेचा दर्जा घसरला असून, दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीने प्रदूषणअधिक झाले आहे. 10 नोव्हेंबर रोजी, वायू प्रदूषणासंदर्भातील सू-मोटो याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मुंबई पोलिसांनी 10, 12 आणि 15 नोव्हेंबर या तीन दिवसांत 784 गुन्हे दाखल केले. याप्रकरणी 806 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यातील 734 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसांत आणखी 350 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात फटाके विक्रेत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
सरन्यायाधीश डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने फटाके फोडण्याच्या वेळेत बदल करून रात्री 8 ते रात्री 10 या वेळेत परवानगी दिली होती. याशिवाय बेरियम रसायन असलेल्या फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.