मुंबई: मुंबईला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये येत्या दोन दिवसांत बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकी देणारा ईमेल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. हा ईमेल निनावी खात्यावरून आला आहे. ईमेल मिळाल्यानंतर मुंबई शहरात पोलीस प्रशासनास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा ईमेल मिळाला आहे. हा ईमेल कोणी पाठवला याचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या ईमेलमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये मोठा बॉम्बस्फोट होणार असल्याचे म्हटले आहे. हा मेल नियंत्रण कक्षाने मुंबई पोलिसांना पाठवला आहे . त्यानंतर पोलीस प्रशासनास याला गांभीर्याने घेत सतर्क राहाण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचाही शोध सुरु…
सध्या पोलीस सदर ईमेल आयडी ट्रॅक करुन पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. या अगोदरही अनेक वेळा असे धमकीचे ईमेल पाठवण्यात आले होते. मात्र कोणीतरी खोडसाळपणा केल्याचे समोर आले होते. संबंधित व्यक्तीस अटकही करण्यात आली होती. मात्र, या वेळी पाठवलेल्या ईमेल ला पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तपास सुरु असून ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.