मुंबई: 2005-06 या कालावधीत एसटी महामंडळाने 2.2 आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस सुरू केल्या. तर काहीअंशी शटल सेवेसाठी अथवा गर्दीच्या ठिकाणी 3.2 आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस कार्यरत ठेवल्या. मात्र, आता पुन्हा एकदा एसटी महामंडळाने 3.2 आसन व्यवस्था असणाऱ्या बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. 3 हजार बस खरेदीकरिता राज्य सरकार महामंडळाला 1 हजार 200 कोटी रुपये देणार आहे. यामुळे लवकरच एसटीच्या ताफ्यात आरामदायी प्रवास घडवण्यासाठी नव्या बसेस दाखल होणार आहेत.
एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 3.2 आसन व्यवस्था असणाऱ्या बीएस VI या गाड्या जास्तीत जास्त प्रवाशांची वाहतूक व्हावी आणि प्रवाशांना सुटसुटीत उभे राहता यावे, यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर लालपरीमध्ये बदल करण्यात येत आहेत. याशिवाय महिला सन्मान योजना म्हणजेच महिलांना हाफ तिकीट, तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक म्हणजेच वय वर्षे 75 वरील नागरिकांना एसटी प्रवास मोफत असल्याने, एसटीत आता प्रचंड गर्दी वाढू लागली आहे. परिणामी एसटी बसेस आणि त्यात असणाऱ्या जास्त आसनांची आवश्यकता भासू लागल्याने अधिक आसन क्षमता असणाऱ्या बसेस ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत.
याशिवाय पूर्वी असणाऱ्या नॉन पुशबॅक (12 मी) बसेसची आसन क्षमता ही 45 इतकी असताना, नव्या अशोक लेलंड रेडीबिल्ट साध्या बसेसमध्ये हीच आसन क्षमता 5 ने कमी होऊन 40 इतकी झाली आहे, त्यामुळे 5 आसनांचा तोटा होत असल्याचे महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या 3.2 आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस खरेदी करण्यात येणार आहेत.
अशा असणार बसेस:
आता नव्यानेच दखल. होणाऱ्या बीएस VI अशोक लेलंड रेडीबिल्ट साध्या बसेस या एअर सस्पेन्शन, पुशबॅक सीटस, प्रत्येक सीटला यूएसबी मोबाईल चार्जिंग इ. सुविधा असलेल्या 11 मीटर लांब अत्यंत सुंदर साध्या असून, 2400 हून अधिक बसेस एसटीच्या सेवेत 2025 अखेर संपूर्ण दाखल होतील, असे एसटी महामंडळाचे म्हणणे आहे.
बसचा दरवाजा जुन्या बिजागरी पद्धतीचाच
एसटी बसमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल असा केला आहे की, महामंडळाने आता येत असलेल्या अशोक लेलंड रेडीबिल्ट बसेसना, हिरकणी तसेच कंत्राटी साध्या बसेसना हवेच्या दाबावर (न्यूमेटिक) आतमध्येच बंद-चालू होणारा प्रवासी दरवाजा दिला आहे, पण आताच्या टेंडरमध्ये पूर्वीच्या गाड्यांसारखा हिंजेस (बिजागरी) वाला दरवाजा असावा, अशी मागणी केली आहे. अर्थातच न्यूमेटिक दरवाजा मेंटेनन्ससाठी कठीण असावा, तसेच दरवाजों बिघडला तर कायमच उघडा राहील, हे सुरक्षितततेच्या दृष्टीने धोक्याचे असल्याने हा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.