मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारी चिन्ह दिले आहे. शरद पवार गटाचे तुतारी चिन्हाचं शनिवारी किल्ले रायगडावर अनावरण होणार आहे. यावेळी खासदार शरद पवार स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शरद पवार गटाने आता आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाला निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांना नमन करुन तुतारी वाजवत, रायगडावरुन सुरुवात करणार, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या तख्ताला भीती वाटणारा तुतारीचा आवाज असेल, असंही आव्हाड म्हणाले. त्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी फुंकून दाखवावी. त्यांना एक 1 लाखाचे बक्षीस देतो, अशी मिश्किल टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
“एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन जी मी स्वप्राणाने… आमचं जितेंद्र आव्हाड यांना चॅलेंज आहे, त्यांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी आणि आपल्याकडून 1 लाखाचं बक्षीस घेऊन जावे. फक्त अट एवढीच आहे, आवाज तुतारीतून आला पाहिजे. तुतारीला कालपासून मार्केट आहे. पण हरकत नाही. विषारी तुतारी वाजवायला माणूस आहे”, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली.