मुंबई: आजारातून बरे झालेले शिवसेनेचे नेते, माजी शिक्षण मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी यापूर्वी तीन वेळा अशी घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा निवृत्तीचे सूर आकळल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांचे राजकीय वारसदार कोण? याची चर्चा रंगली आहे. राणेंचे कट्टर समर्थक संजू परब आणि शिवसेनेचे (ठाकरे) नेते राजन तेली यांचे प्रस्त या मतदारसंघात असल्याने त्यांच्यात तेथे वर्चस्व वाद रंगण्याची चिन्हे आहेत. राणे परब यांना बळ देण्याचा प्रयत्न करतील, तर तेली यांना आपले अस्तित्व राखण्यासाठी मोट बांधावी लागणार आहे.
केसरकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून एका जाहीर क्रार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. अचानक केलेल्या या घोषणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या प्रवक्ते पदाची कमान यशस्वी पेलली होती. शिवसेनेकडून (ठाकरे) होणाऱ्या आरोपांना अतिशय शांत पद्धतीने प्रत्युत्तर दिले. मात्र २०२४ च्या निवडणुकीनंतर त्यांना मंत्री पदाची पुन्हा संधी देण्यात आली नाही. अनेकदा याबाबत खंत बोलून दाखवल्यानंतर आता तर त्यांनी थेट निवृत्तीची घोषणा केली आहे.
राणे परिवाराकडून परब यांना राजकीय बळ
शिवसेनेच्या जिल्हास्तरावर परब यांना केंद्रस्थानी ठेवून राणे परिवाराकडून राजकीय बळ देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात परब विरोधात तेली असा सामना या ठिकाणी राहण्याची चिन्हे आहेत. परब आणि तेली दोघेही या विधानसभा मतदारसंघात आपले वर्चस्व राखण्यासाठी जोर लावण्याची शक्यता आहे.
आघाडीतील फुटीचा झाला फायदा
केसरकर यांनी यापूर्वी तीन वेळा निवृत्तीची घोषणा केली होती. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात केसरकर यांचा पन्नास-साठ हजार कार्यकर्त्यांचा गट होता. परंतु, शिवसेनेत पडलेल्या फुटीनतर ही संख्या निम्मी झाली. तरीही केसरकर यांनी शिवसेनेचे नेते राजन तेली यांचा पराभव करत विजय खेचून आणला. महाविकास आघाडीत एकमत नसल्याने मते विभागली आणि याचा फायदा केसरकर याना झाला.
मुलगी व जावई यांच्या नावाची चर्चा
आता केसरकर यांनी निवृत्तीची घोषणा केल्याने त्यांचा राजकीय वारसदार म्हणून मुलगी सोनाली आणि जावई सिद्धार्थ यांच्या नावाची आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राजन तेली यांच्यासारख्या खमक्या नेत्याला टक्कर देण्यासाठी आक्रमक चेहरा हवा. सध्या आमदार निलेश राणे शिवसेनेत असल्यामुळे या ठिकाणी आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे भाजपचे नेते नारायण राणे, मंत्री नितेश राणे आणि निलेश राणे यांचे कट्टर समर्थक संजू परब यांचे नाव येथे चर्चेत आहे.