Maharashtra weather update : मुंबई : राज्यात नागरिक एकाच वेळी पावसाळा, उष्णता आणि थंडी अनुभवतायत. राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाहाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे ६ तारखेनंतर अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अद्रता वाढल्याने उष्णता देखील वाढणार आहे. तर पाऊस झाल्यामुळे थंडीत देखील वाढ होणार आहे. वातावरणातील या चढ आणि उतारामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे.
पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. पुढील 48 तासांत राज्यातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे.
यामुळे देशासह राज्यात काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या हवामानावरही परिणाम होणार आहे. पुढील काही दिवसात मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे, असं आयएमडीने म्हटलं आहे.