मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने अद्याप त्याची दखल न घेतल्याने आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शुक्ला यांना तत्काळ पदावरून हटवण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.
गुरुवारी याबाबत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटोले यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने २७ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. शुक्ला यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे व त्यांना नाहक त्रास देण्याचे फर्मान पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना सोडले आहे.
पोलीस यंत्रणा विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची अडवणूक करत आहे. त्यांच्यावर दबाव आणत आहे. शुक्ला यांची कार्यपद्धती याआधीही वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते. त्यावरून शुक्ला यांच्याविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.