मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरले आहे. महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक घटली असून परदेशातील उद्योग अन्य राज्यांत जात आहेत, असा दावा विरोधकांकडून नेहमी केला जातो. तर राज्यातील परकीय गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येणाऱ्या काळातही अनेक उद्योग राज्यात येतील, असे सत्ताधाऱ्यांकडून कायम म्हटले जाते. दरम्यान, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र हा अव्वल क्रमांकावर आहे, असे सांगितले आहे. त्याबाबत आकडेवरीच फडणवीसांनी प्रसिद्ध केली आहे.
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्या वर्षी क्रमांक एकवर राहिला आहे. एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक एकवर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांतसुद्धा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल 30 मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे, असे फडणवीस आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच राज्यात 2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटी तर 2023-24 या आर्थिक वर्षांत 1,25,101 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या दोन्ही आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे. तर दुसर्या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते…
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्या वर्षी क्रमांक 1 वर !
एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे.
केंद्र सरकारच्या… pic.twitter.com/2js1CYr59s— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 31, 2024
यावेळी त्यांनी यापूर्वी महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला चांगलंच डिवचले आहे. बोलायला नाही, तर कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते. महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो, असं देखील फडणवीसांनी म्हटले आहे.