मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Body Elections) राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांची (Star Campaigners) मर्यादा आता 20 वरून 40 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

राजकीय पक्षांच्या विविध प्रतिनिधींनी 14 ऑक्टोबर 2025 रोजी आयोगाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. त्यानंतर आयोगाने संबंधित मागणी विचारात घेत, ‘महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, 2025’ मधील परिच्छेद 26 अंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार हा निर्णय घेतला आहे.
या नव्या निर्णयानुसार, राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे पक्षांना प्रचारासाठी अधिक व्यापक पातळीवर नियोजन करता येणार आहे.






