Nandurbar Bus Accident : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील देवगुई घाटात अमलीबारीजवळ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शालेय बसचा भीषण अपघात झाला. येथे 80 ते 100 फुट बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून तीसपेक्षा अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे येथील अनुदानित आश्रमशाळेची होती. दिवाळीच्या सुट्टीनंतर आपल्या गावांहून परतणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी ही बस अक्कलकुव्याच्या मोलगी परिसरात आली होती. परतीच्या प्रवासादरम्यान चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस थेट 100 फूट दरीत कोसळली.
या दुर्घटनेवेळी बसमध्ये एकूण 54 विद्यार्थी आणि दोन कर्मचारी प्रवास करत होते. यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दरीत उतरून बचावकार्य सुरू केले. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचाही तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, या अनुदानित आश्रमशाळेने विद्यार्थ्यांना आणण्यासाठी दोन बस पाठवल्याची माहिती असून, त्यापैकी एक बस अपघातग्रस्त झाली आहे. बसची क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे 54 प्रवासी असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या वाहनांमधून देखील विद्यार्थ्यांना नेण्यात आल्याची चर्चा आहे.
या अपघाताबाबत पोलीस किंवा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, बसच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी नेल्यामुळे निष्काळजीपणाचा मुद्दा समोर आला असून, या प्रकरणात जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.







