पुणे: शहरात एका अल्पवयीन (Pune Crime) मतिमंद मुलीसोबत अश्लील कृत्य (Pune News) करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी एका 70 वर्षीय ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 10 वर्षांची असून, ती मतिमंद आहे. आरोपी ज्येष्ठ नागरिक हा मुलीच्या कुटुंबाच्या परिचयाचा असून, तो त्यांच्या घराशेजारीच राहतो. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मतिमंद मुलगी घरासमोर खेळत असताना आरोपीने तिला आमिष दाखवले. त्यानंतर घराशेजारी असलेल्या अडगळीच्या जागेत नेऊन तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे मुलगी खूप घाबरली. तिने घरी आल्यावर घडलेली माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी ज्येष्ठाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (POCSO) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदने करत आहेत.







